मराठीचा आवाज केविलवाणा नाही स्वाभिमान टिकवण्याचे काम सर्वाचे : मुख्यमंत्री

मुंबई दि. २७: मराठ्यांच्या घोड्यांच्या टापाचा आवाज ऐकला तरी दुष्मनांची पळापळ व्हायची, या टापांचा आवाज खणखणीत तर मग मराठीचा आवाज केविलवाणा कसा? असा सवाल उपस्थित करून मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी मराठीचा आवाज अजिबात केविलवाणा नसल्याचे आणि



मराठीचा स्वाभिमान टिकविण्याचे काम आपणा सर्वांचे आहे असे स्पष्ट केले. एवढेच नाही तर मराठी ही छत्रपती शिवाजीमहाराजांच्या जिजाऊंची भाषा आहे, स्वराज्याची मानव भाषा आहे ती टिकणारच असा विश्वासही व्यक्त केला. राजभाषा मराठी गौरव दिनानिमित्ताने विधानमंडळात इये मराठीचिये नगरी या कार्यक्रमाचे आयोजन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपसभापती नीलम गो-हे, परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई, परिवहन मंत्री अनिल परब, साहित्यिका नीलिमा गुंडी यांच्यासह मंत्रीमंडळ सदस्य, विधानमंडळ सदस्य आणि शालेय विद्यार्थी उपस्थित होते. ___मराठीचा आग्रह एक दिवसासाठी, एका वर्षासाठी नाही तर संपुर्ण आयुष्य मराठी, मराठी आणि मराठीच झालं पाहिजे असे आवाहन करून मुख्यमंत्री म्हणाले की बये दार उघड' असं सांगणारी भाषा मराठीच, प्रत्येक संकटात धावून येणारी मराठीच, मुगल आणि इंग्रजांना पुरुन उरलेली भाषा आपली मराठीच आहे. त्यामुळे मराठी टिकेल की नाही याची चिंता नको. आज आपल्या आईचा सन्मान : आज आपण सर्वमिळून आपल्या आईचा सन्मान करत असल्याची भावना व्यक्त करून श्री. ठाकरे म्हणाले की, मराठी ही हृदयावर, डोंगर कपारीत कोरली गेलेली भाषा आहे, आपण बोलत राहिलो तरी ती पुढच्या पिढीपर्यंत प्रवाहित होत जाईल, आपल्या भाषेचा एकच दिवस का साजरा करायचा, बरं करायचा तर मराठी भाषा टिकेल की नाही ही चिंता मनात बाळगून तो का साजरा करायचा ?