ठाकरे सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीनुसार एकूण १५ हजार ३५८ शेतकऱ्यांना लाभ मिळाला असून हे सर्व शेतकरी ६८ गावातील आहेत.
बहुजन कल्याण विभागाचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज प्रसारमाध्यमांशी बोलतना ही माहिती दिली. राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची पहिली यादी जाहीर करण्यात आली असून यात १५ हजार ३५८ लाभार्थ्यांची नावं आहेत. ६८ गावांतील लाभार्थ्यांची ही पहिली यादी आहे. तसेच ३४ लाख ८३ हजार ९०८ खात्यांची माहिती संकलित करण्यात आली आहेत. कर्जमाफी झाल्यानंतर शेतकऱ्यांना प्रमाणपत्रं दिलं जात आहे. नुसता अंगठ्याचा ठसा देताच शेतकऱ्यांना कर्ज वितरीत केलं जात आहे, अशी माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली.
यापूर्वीच्या सरकारने पाच वर्षे कर्जमाफीचा निव्वळ गाजावाजा केला. वर्तमानपत्रात पानभर जाहिराती दिल्या. जाहिरातीवर खर्च केला पण शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही, असं सांगतानाच मागच्या सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसल्याने त्यावर बोलण्याचा त्यांना अधिकारच नाही, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली. आता कर्जमाफीसाठी १५ हजार कोटी रुपयांची पुरवणी मागणी विधानसभेच्या पटलावर ठेवली आहे. त्यावर २७ फेब्रुवारी आणि २ मार्च रोजी यावर चर्चा होणार आहे, असंही त्यांनी सांगितलं.
१५ हजार लाभार्थी; शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी जाहीर