'करोना'मुक्त झालेल्या दाम्पत्यानं सांगितला अनुभव

पुण्यातील पहिले करोनाग्रस्त दाम्पत्य रोगमुक्त झाले असून त्यांना आजच नायडू रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर घरी परतलेल्या या दाम्पत्यानं नायडू रुग्णालयाच्या सर्व डॉक्टर व कर्मचाऱ्यांचे आभार मानणारे पत्र लिहिले असून राज्यातील जनतेसाठीही एक महत्त्वाचा संदेश दिला आहे.


आपल्या पत्रात ते लिहितात, ३ मार्च रोजी आम्ही आरोग्य तपासणीसाठी नायडू रुग्णालयात दाखल झालो. चाचणी पॉझिटिव्ह आल्यानं आमच्यावर उपचार सुरू करण्यात आले. रुग्णालयात दाखल झाल्यापासून आम्ही डॉक्टरांच्या सूचनांचे व रुग्णालयाच्या नियमांचे तंतोतंत पालन केले. तब्बल १४ दिवस उपचार झाल्यावर १५ व्या व १६ व्या दिवशी आमची पुन्हा चाचणी घेण्यात आली. ती निगेटिव्ह आल्यानं आम्हाला आज घरी सोडण्यात आलंय.'