पत्नी, दोन मुलांची हत्या करून व्यापाऱ्याची आत्महत्या

ऑनलाइन व्यवसाय करणाऱ्या एका इसमाने पत्नी व दोन मुलांची हत्या करून नंतर गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना तळोजा भागात घडली आहे. हे कुटुंब भाडेतत्त्वावर राहत होते. फ्लॅटमालक आज भाडे घेण्यासाठी आला असता हा धक्कादायक प्रकार समोर आला.

आत्महत्या करणाऱ्या व्यापाऱ्याचे नाव नितेश उपाध्याय (३०) असे आहे. त्याने पत्नी बबली (३०) तसेच आठ वर्षांची मुलगी व ७ वर्षांच्या मुलाची हत्या करून नंतर आत्महत्या केल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. तळोजा सेक्टर ९ मधील शीव कॉर्नर या इमारतीत हा प्रकार घडला. मृतदेहांची अवस्था पाहता ही घटना घडून एक दिवसापेक्षाही जास्त कालावधी झाला असावा, अशी शक्यता आहे.


राजेंद्र भारद्वाज यांच्या मालकीचा हा फ्लॅट आहे. ते आज भाडे घेण्यासाठी आले होते. त्यांनी फ्लॅटचा दरवाजाचा ठोठावला असता आतून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर त्यांनी सोसायटी ऑफिसमध्ये जाऊन अध्यक्षांना हा प्रकार सांगितला. दरम्यान, डुप्लिकेट चावीने दरवाजा उघडला असता आतील प्रकार पाहून सर्वांनाच धक्का बसला. नितेश यांनी पंख्याला गळफास घेतला होता तर अन्य तिघांचे मृतदेह घरात वेगवेगळ्या ठिकाणी होते. फ्लॅटमध्ये एक सुसाइड नोट आढळली असून त्यात 'सोने आणि रोख रक्कम बेडरूममध्ये ठेवण्यात आली आहे' असे नमूद करण्यात आले आहे. हिंदू पद्धतीने आमच्यावर अंत्यसंस्कार करण्यात यावेत, असेही या नोटमध्ये लिहिले आहे.